सनगर समाजातील घोंगडी व्यवसायिक
मारुती बाबुराव राऊत, बलवडी
भिकाजी दत्तात्रय करंडे, बलवडी
चंद्रकांत सनगर, पेठ वडगाव
श्री दादासो रामचंद्र ञिगुणे,
बहिरेश्वर कोल्हापूर
'काठी न घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी जत्रेला येऊ द्या की रं...' हे लोकगीत महाराष्ट्रातील तमाम जत्रांचे हुबेहूब चित्र उभे करते. हे गाणं शहरांमधून शाळांच्या स्नेहसंमेलनात आणि युवा महोत्सवांतही हमखास प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविते. यातील घोंगडी महाराष्ट्रातील परंपरेचा एक महत्त्वाचा घटक आहे. अगदी प्राचीन काळापासून महाराष्ट्रात घोंगडीचा वापर होत आला आहे. उबदार आणि ऊर्जा निर्माण करणारे पांघरुण,अशी या घोंगडीची ओळख आहे. केवळ पांघरुण म्हणून नव्हे तर घोंगडीचे आरोग्य आणि अध्यात्माच्या दृष्टीने देखील महत्त्व आहे. मात्र, काळाच्या ओघात पारंपरिक घोंगडी मागे पडत आहे. त्यामुळे या व्यवसायासमोर आव्हाने उभी आहेत. केवळ एक वस्तू इतपतच या घोंगडीची किंमत नाही; ग्रामीण संस्कृतीची पाळंमुळं या घोंगडीत दडलेली आहेत. म्हणूनच संस्कृती आणि कलेसाठी घोंगडीची जोपासना व्हायला हवी. त्यासाठी सर्वत्र घोंगडीचा वापर वाढला पाहिजे; तसेच घोंगडीला राजाश्रय मिळावा, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी भावना या व्यवसायात असलेल्या बांधवांची आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात विणल्या जाणाऱ्या घोंगड्या राज्यभर प्रसिद्ध आहेत. मात्र, सध्या या तालुक्यात घोंगडी व्यवसाय हद्दपार होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र घोंगडीचा वापर कमी झाल्याने यातील कारागीर कमी झाले आहेत. तसेच यातून मिळणारे उत्पन्नही खूप कमी आहे. दुसरीकडे चादर, चटई, गादी, रजई आदी प्रकार अलीकडे बाजारात आल्याने घोंगडी आपोआपच दुर्लक्षिली जात आहे. नवीन पर्याय आले की जुन्याची किंमत कमी होते, हा उद्योगचक्राचा नियमच आहे; मात्र परंपरा, कला आणि संस्कृतीला हा नियम लागू केल्यास त्यातून चांगले काही हाती लागत नाही. म्हणून आपली परंपरा, कला आणि संस्कृती टिकविण्यासाठी घोंगडी टिकली पाहिजे आणि सर्वत्र घोंगडीचा वापर वाढला पाहिजे.
पूर्वी ग्रामीण भागात लग्न समारंभ, बैठकांसाठी प्रामुख्याने घोंगडीचाच वापर व्हायचा. आजही अनेक ठिकाणीं घोंगडी बैठका होतात. राजकारणातील घोंगडी बैठका तर प्रसिद्ध आहेत. घोंगडीवर बसून केलेल्या व्यवहाराच्या, सोयरिकीच्या बैठकी मोडत नाहीत, अशी एक भावना पूर्वी होती. तर बिरोबा, खंडोबा, बाळूमामा अशा देवांच्या ठिकाणी वाहण्यासाठी घोंगडीचा वापर होतो. तसेच जागरण गोंधळ यातदेखील देव घोंगडीवरच मांडले जातात. ध्यानधारणा करण्यासाठी, धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी घोंगडी वापराला अनन्यसाधारण महत्त्व होते. तसा उल्लेखही विविध धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठलाला देखील घोंगडी पांघरून पूजा केली जाते.
झोप येत नसणाऱ्यांसाठी घोंगडी हे एक उत्तम औषध आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते. घोंगडीच्या वापरामुळे बॉडी टेम्परेचर आणि शारीरिक ऊर्जा कंट्रोलमध्ये राहात असल्यामुळे घोंगडीवर केलेल्या साधनेचे समाधान मिळते. तसेच पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीपासून आराम मिळतो. तसेच उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात.
घोंगडी हा तसा ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये अगदी सहज दिसणारा घटक. जमिनीवर अंथरुण म्हणून, कधी पांघरुण म्हणून, तर पावसाळ्यात शेतावर जाताना घोंगडी वापरली जाते. पावसाळा आणि हिवाळ्यात शेतीची कामे करताना ऊब मिळावी म्हणून शेतकरी आजही घोंगडीचा वापर करतो. घोंगडी हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते. घोंगडीवर झोपल्याने साप, विंचू जवळ येत नाही, असा समज असल्यामुळे रात्री शेतीच्या कामावर जाणारे शेतकरी सर्रास घोंगडीचा वापर करतात.
अंथरायला-पांघरायला घोंगडीचा वापर एकेकाळी घरोघरी दिसून यायचा. पण बदलत्या काळात आता घोंगडीचा वापर कमी होऊ लागला आहे. तरीही राज्यातील अनेक मोठ्या यात्रांमधून अजूनही घोंगड्यांची बऱ्यापैकी विक्री होते. याच बाजारपेठेवर हा व्यवसाय सध्या टिकलेला आहे. मात्र, मागील काही वर्षात चादर, चटई, गादी, रजई आदी प्रकार बाजारात आल्याने घोंगडी आपोआपच दुर्लक्षिली गेली आहे. परंतु, डोंगराळ भागात आजही घोंगड्यांचा वापर सुरू आहे. घोंगडी व्यवसाय संध्या धोक्यात आल्याची खंत विणकर व्यक्त करीत आहेत. घोंगडी उत्पादनाचा वाढता खर्च कमी होणारी विक्री आणि अल्प किमतीतही बाजारपेठ न मिळणे अशी प्रमुख कारणे हा व्यवसाय धोक्यात येण्यासाठीची आहेत. शहरी भागात ग्राहकांनी कारखान्यात तयार होणाऱ्या आकर्षक रंगाच्या चादरी, चटई, गादी स्वीकारल्या आहेत. वाढत्या उत्पादन खर्चामुळे फायदा कमी होत असल्याने घोंगडी तयार करणा-यांची संख्याही कमी होत असून लोकरीचा दरही वाढला आहे. त्याचाही परिणाम व्यवसायावर झाला आहे.
एका मेंढरापासून मिळणारी लोकर - ४०० ग्रॅम
एका घोंगडीसाठी लागणारी लोकर ३ ते ४ किलो
घोंगडी विणण्यासाठी सरासरी खर्च - ४००-५००रु.
एका घोंगडीची सरासरी किंमत - १०००-१२००रु.
वेदपूर्वकाली मानवी गरजातून बारा बलूतेदार व अठरा सणगर ही अठरा आलूतेदारामधली उघडा नागडा हाडांचा सापळा, अर्धा अगोदरच खड्ड्यात ठेवून अर्धपोटी सर्व कुटुंबासह दिवसभर घाम गाळून घोंगडी विणकामाच्या व्यवसायावर कसाबसा करून जगणारी ही जमात. मात्र घोंगडी विणकामाचा व्यवसाय आता जेष्ठांपुरताच मर्यादीत राहिला आहे. सद्याच्या पिढीतील बहुतांश तरूणांना (घोंगडी) म्हणजे काय हे सुद्धा सांगता येणार नाही. म्हणून त्यांच्या माहितीसाठी घोंगडी विणकामाची प्रक्रिया उपलब्ध माहिती नुसार पुढीलप्रमाणे
महाराष्ट्रातील धनगर समाज शेतीबरोबर मेंढपालनाचा व्यवसाय करतो. सन्नकी म्हणजे मेंढी. वर्षातून दोन वेळा मेंढ्यांची लोकर कातरून ती साठविली जाते. त्यातून धनगर समाजातील स्त्री पुरूष वर्ग रहाटावर किंवा भिंगरीवर (चातीवर) सूत काततात. कताईसाठी लोकर वापरण्यापूर्वी ती पिंजून घ्यावी लागते. पिंजलेल्या लोकरीचा पैलू करून त्याचा कताईसाठी उपयोग केला जातो.
कातून तयार झालेले सूत एकत्र करून प्रामुख्याने धनगर समाजातील स्त्री पुरूष विक्रीसाठी बाजारात आणतात. विक्रीस आणलेले सूत पाटगे व मुऱ्यांच्या स्वरूपात असते. १) पाटगा हा लहान असतो. २) मुऱ्यांतील एकूण धागे ५ तंतूंचा १ तिरीक, २० तिरीकांची १ दंडी, ९ दंड्यघांची १ मुरी. पाटग्यात व मुऱ्यांत ठराविक (९००) धागे असतात. पाटगे व मुऱ्यांची लांबी, सूताचा पोत, जाडी, पीळ व रंग यावर त्या सूतांची किंमत केली जाते. प्रत्येक पाटग्यातील व मुऱ्यांतील धाग्यांची संख्या सणगर व धनगर यानी एकमेकांच्या विश्वासावर पूर्व परांगत ठरलेली आहे. असा सूत खरेदीचा व्यवहार आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी चालतो.
खरेदी केलेले सूत सनगर कारागीर घोंगडी तयार करण्यासाठी उपयोगात आणतो. तो त्याच्या उपजिवीकेचा प्रमुख असा धंदा आहे. धनगर/सणगर कारागीर हा खरा तर देशाचा उत्पादक वर्ग आहे. पण त्यांच्या श्रमातून निर्माण झालेल्या संपत्तीवर मात्र त्यांचा अधिकार नाही.
पाटगे व मुऱ्या यांचे सूत स्त्रिया व मुलांकडून उकलले जाते. स्त्रियांकडून या सूताचा ताणारीच्या सहाय्याने ताणा काढला जातो. ठराविक लांबी रूंदीच्या घोंगडीसाठी ठराविक लांबीचे धागे असलेला ताणा वापरतात. ताणा तयार झालेवर त्याची परामणी (पांजणी पूर्वीची क्रिया) केली जाते. सर्व धागे क्रमवार लावून पाजणी करण्याची तयारी केली जाते. पाजणी साठी वापरावयाच्या जागेस व्हळ म्हणतात. पांजणीसाठी चिंचोक्याची खळ (पांजण) तयार करावी लागते. प्रथम दगडावर चिंचोके फोडले जातात. नंतर पाण्यात रात्रभर भिजत घालतात. दुसरे दिवशी अगदी सकाळी कुटुंबातील स्त्रीकडून भिजत घातलेले चिंचोके खरबरीत दगडावर दोन्ही हातांनी घासून घासून त्यावरील भिजलेली सालपटे काढून, चिंचोके पांढरे स्वच्छ केले जातात. नंतर चिंचोके दगडी घाण्यात घालून, गदडी लाटेच्या सहाय्याने वाटून बारीक मऊ मेणासारखे करावे लागते. सायंकाळी पांजण वाटण्याचे काम स्त्रीया करतात. हे काम अत्यंत कष्टाचे आहे. वाटलेले पांजण दुसरे दिवशी सकाळी पाणी घालून घट्ट होईपर्यंत शिजवतात. शिजवल्यानंतर त्यास चिकटपणा येतो. परामणीची पांजणी करतेवेळी पांजन दोन अगर तीन वेळा लावतात. पांजणीच्या वेळेस गरजेनुसार बायका व मुले मदत करतात. पांजणीस पांजण खळ लावलेनंतर कुचीच्या सहाय्याने (विशिष्ट गवताचा तयार केलेला कुंचला) घोंगडी विणकर सुतास लावलेले पांजण निरपून काढून (थोडेबहूत पांजण शिल्लक राहते) पांजणी करतो म्हणजे लोकरीचे सूत चिंचोक्यांची खळ लावून कुचीने कमी जास्त असलेले पांजण काढून, उर्वरीत (थोडे बहुत) पांजणासह खळ वाळल्यानंतर त्यास पांजणी झाली असे म्हणतात.
पांजणीच्या कुच्या काढताना विणकरांच्या पोटास पीळ पडेल इतके हे अत्यंत कष्टाचे काम आहे. पांजणी करते वेळी वापरणाऱ्या कुचीची किंमत साधारणपणे दिडशे ते दोनशे रूपये असते. पूर्वी घोंगडी विणकराचे गावी कुची बांधणारे कुचीवाले तथा माकडवाले कुची बांधून देत असत. घोंगडी विणकर त्यास पैसे देत असत पण कुची बांधेपर्यंत दोन्ही वेळचे जेवणही देत असत. शेवटचे गोड (पुरणपोळी) जेवण त्याचे पाहूणचार असे.
b पांजणी उन्हात वाळल्यानंतर जुंपण्यावरील पांजणाने चिकटून बसलेले धागे (सूत) हाताच्या बोटांनी सुटे (मोकळे) करून, ज्या रूंदीचे घोंगडे करावयाचे असते, त्या लांबी इतके मूळ जुंपण्यावर जुळून घेतात. नंतर घोंगड्यांच्या रूंदीचा जुंपणा त्या जुंपण्याचे पुढे पांजणीत ओढून मूळ जूंपणा (पांजणीचे वेळी वापरलेला) बाहेर ओढून काढला जातो. नविन छोट्या जूंपण्यावर जुंपलेल्या सुताला (पांजणीचे धाग्याला) पांजण लावून ते धागे त्यावर चिकटवले जातात आणि थोडा वेळ पांजणी वाळत ठेवतात. पांजणीचा दोर ढिला (सैल) करून काही भागात, काही लोक डांगेवरच वई भरतात. (विणकामाला लागणारी फणी-पांजण लावलेली कापसांचे पिळदार सुताची तयार करतात.)
विणकामासाठी तूर, कोपूर, वक्तुल, वई, सुतारी, वईकाठी, निरी, यव, डिरा, टुमकूल, वासत्या (केतकीच्या वातापासून तयार केलेल्या) उभा खुटा, हात खुटा (ही तीन अवजारे लाकडी असतात) जत्थार, मणी, तूर, यव आणि कांब ही अवजारे खैराच्या लाकडाची असतात. बाकी सर्व अवजारे बाभळीच्या लाकडाची असतात. कोपूर व सुताटी लोखंडी असतात. जत्थार बारीक दोरीने वरच्या आडवे काठीस टांगलेले असते. यासही मणी (कप्पी) असते. विणकाम दोन, तीन बोटे झाल्यानंतर रूंदी खालून टोचतात. मागासाठी मांडीएवढ्या खोलीचा साधारण दोन बाय एक फुटाचा अगर दोन बाय तीन फुटांचा खड्डा असतो. खड्डयात दोन्ही पाय सोडून मागात बसून घोंगडी विणकर विणकाम करतो. तूर व उभा खुंटा यामधील जागेला (ज्यावर पाजणी पसरली जाते) धाव म्हणतात.
खड्ड्यात पाय सोडून बसल्यानंतर दोन्ही हातांनी यवाच्या सहाय्याने विणकर विणकाम करतो. विणकामास वापरलेल्या सूतास आडव्याचे सूत म्हणतात. है सूत प्रथम लाकडी नळीवर भरले (गुंडाळले जाते. या नळीच्या (धोट्याच्या सहाय्याने आडवे धागे, उभ्या धाग्यात घालून यवाच्या मदतीने ठोकून एकास एक लावले जातात यालाच विणकाम म्हणतात. उभ्या धाग्यात आडवे धागे ठेचून बसविल्यानंतर विणकाम एकजीव होण्यासाठी कापडाच्या बोळ्याने विणकामांवर चोळून पाणी लावले जाते. पांजणी करताना कुच्या काढणे आणि विणकाम करीत असताना यवाने ठोके देणे हे काम अत्यंत मेहनतीचे आणि कष्टाचे असल्यामुळे विणकरांस पोटाचे, छातीचे, कमरेचे, मणक्याचे व गुडघ्याचे रोग होतात. विणकामाच्या वेळी सतत खड्ड्यात पाय सोडावे लागतात त्यामुळे गुडघी दुखी हा रोग होण्याचा संभव असतो. शेकडा ७५% हून अधिक विणकर म्हातारपणी कमरेत वाकलेले असतात. याचा परिणाम ते अकाली निकामी होतात, अर्थार्जन करू शकत नाहीत. आधीच गरीब असलेला हा माणूस गरीबीला निमंत्रण देतो. घोंगडी विणून झाल्यावर ती दोन खुट्यांना टांगून, मध्ये लोखंडी पारेचा भर घालून, वाळविली जाते. वाळलेली चार घोंगडी एकत्र जुळवतात (करतात) यास बोधीवर ठरविला जातो.
अधिक कष्टांचा, कमी मोबदला देणारा आणि अनेक रोगांना निमंत्रण देणारा असा हा वंशपरंपरागत धंदा कुठल्याही नविन अवजाराचा व तंत्रज्ञानाचा उपयोग न करता पिढ्यघान् पिढ्या चालला आहे. कोष्टी लोकाच्या हातमागावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून आता पावरलूमवर आधुनिक पद्धतीच्या वेगवेगळ्या साड्या बनविल्या जातात. त्याप्रमाणे घोंगडी विणकाम व्यवसायाच्या हत्यारामध्ये कुठल्याही नविन अवजाराचा व तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता आला नाही. कागल जवळील श्री क्षेत्र सिद्धीगिरी मठामध्ये पुतळ्यांच्या स्वरूपात. प्रत्येक समाजाची माहिती दिली आहे. त्यात सणगर समाजाचीही इत्थंभूत माहिती आहे.
या समाजातील तरूणवर्ग मात्र या कष्टप्रत व्यवसायाकडे न वळता अन्य व्यवसाय व नोकरीकडे वळला आहे. म्हणून त्यांना घोंगडी म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. म्हणून हा व्यवसाय आता फक्त ज्येष्ठांच्या हाती राहीला आहे व त्या वयोवृद्धांनी अजून तरी जपला आहे. मागावर हरवळ, डेंग, चौधसी, घाडींशी अशा घोंगडी तयार केल्या जातात. तथापि अशा घोंगड्यांना उठाव नसल्याने व सोलापूरी चादरी वेगवेगळ्या ब्लँकेटस् बाजारात उपलब्ध असल्याने घोंगडी हा व्यवसाय पूर्णपणे लय पावला आहे.
लोकरीच्या सूतापासून घोंगडी तयार करणेसाठी त्या धंद्याचे स्वरुप व त्या धंद्यातील पोट विभाग यावर विचार करावयाचा झालेस त्यामध्ये लोकरीपासून ताना तयार करणे व तान्यास खळ लावून खळीपासून पांजणी तयार करतात. पाजणी झालेवर मागावर घालून घोंगडी तयार होतात. त्यातील प्रत्येक कामाचे विवरण खालील प्रमाणे आहे.
ताना तयार करणे :
लोकरीचे सूत धनगर समाजाकडून बाजारात मुरीच्या स्वरुपात विकत मिळते. मुरी म्हणजे ठराविक लांबीत लोकरीच्या सूतापासून ठराविक बेडे घालून मुरी बनवितात. चार वेडे झालेली एक तिरीक म्हणतात. असे वीस तिरीक मोजून एक दुंडी तयार होते. अशा नऊ दुंड्या झाल्या की एक मुरी तयार होते. अशा मुरीच्या स्वरुपात धनगराकडून लोकर विकत घेतली जाते.
ही मुरी घेऊन धनगरांनी घातलेले वेडे पायात मुरी अडकवून एकेरी सूताचा ढिग तयार करतात. ठराविक ढीग झाला की त्याला गावला करतात. असे गावले एका मुरीत ३-४ तयार करतात. असे गावले घेऊन त्यापासून तानारी व पुरणीच्या मदतीने ताना तयार करतात. ही कामे सणगरांच्या स्त्रियांना करावी लागतात. तानारीवर सुध्दा चार वेड्याचा तिरीक व वीस तिरकांची एक दुंडी प्रमाणे एक तान्यात सुताच्या जाडी नुसार ३ ते ६ दुंड्या एका तान्यात सूत घालतात. अशा तऱ्हेने ताना तयार केला जातो.
खळ तयार करणे :
खळ ही चिंचोक्यापासून तयार करतात. चिंचोके चिंचेच्या झाडापासून चिंचा मिळतात. ठराविक लोक चिंचा खरेदी करुन त्यातील मऊ सालीचा भाग चिंच म्हणून स्वयंपाक अगर खाण्यासाठी उपयोगात आणतात. त्याला दर पण चांगला मिळतो. आतील ठणक भाग म्हणजे चिंचोका. हा सणगरांना व्यापाऱ्याकडून विकत आणावे लागतात.
चिंचोके आणल्या नंतर दगडी पाट्यावर ठेवून दुसऱ्या दगडाच्या सहाय्याने ठोकून फोडावे लागतात. फोडलेले चिंचोके ६-७ तास पाण्यात घालून भिजवावे लागतात. चांगले भिजल्यावर चिंचोके मऊ (नरम) होऊन फुगतात. असे भिजलेले चिंचोके घेऊन त्याखाली हे मऊ चिंचोके थोडे थोडे ढकलून वाटावे लागतात. यासाठी दोन मजूर दगडाचा मोठा पाटा व दगडी भळासारखा दगड घेऊन साधारणत: १ तास चिंचोके वाटण्याचे काम लागते. साधारणपणे पूरण पोळीतल्या पुरणासारखा हा लगदा झालेवर हा लगदा एका मोठ्या डब्यात अगर पातेल्यात घालून चुलीवर शिजवावा लागतो. तो रटरट होईपर्यंत जाळ घालून शिजवतात. यासाठी जळण पण खूप लागते. त्यासाठी हे जळण मिळविण्यासाठी पूर्वीच्याकाळी गुरे चरण्यासाठी चराऊ कुरणात जात असत. कुरणात खूपच शेणकुटे उपलब्ध असतात. ही शेणकुटे वेचून आणणेसाठी सणगरांच्या स्त्रियांना पहाटे उठून शेणकुटे गोळा करुन जंगलातून आणावी लागत त्याच बरोबर जंगलात लाकूड फाटापण खूप मिळत असत. हे काम पूर्वी फुकटात उपलब्ध होतहोते. यासाठी मात्र स्त्रियांना झुंडी करुन सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ९ पर्यंत राबावे लागते. मात्र सध्या गुरे चरणीवर जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच लाकूड फाटा पण फुकटात मिळण्याचा बंद झालेला आहे. त्यामुळे सध्या जळण विकतच घ्यावे लागते. जळनाचा साठा हंगामशीर करुन ठेवावा लागतो. सध्याच्या काळात काम सुध्दा खूप त्रासाचे झाले आहे. सर्वसामान्य कुटुंब व सणगरांचे कुटुंब यामध्ये जळणाच्या बाबतीत विचार केला तर इतर कुटुंबाच्या लागणाऱ्या जळणापेक्षा दुप्पट जळण सणगरांना लागत असते. त्यामुळे आर्थिक ताप त्यांना जास्त पडतो.
घोंगडी विणकामासाठी लागणारी औजारे :
तानारी, पुरणी, बैला, दोर डांग (मोठी व जाड काडी) जुपमा, लहान, दोन काठ्या, बास्त्या, शिजवलेली खळ, खड्डा मात्र, हात खुंठा, दोर खुंठा, तुर, याव, रुंदी, जतार, निरी, पोगर, ठोमकुल, चमड्याच्या दोन बास्त्या, दोर, नळ्या, जतार, बांधणीसाठी तोरणी, नरबाळणे इत्यादी साहित्य लागते.
पांजणी तयार करणे :
तयार केलेला ताना घेऊन अंगणात अगर रिकाम्या जागेत बाहेर व्हळ तयार करावी लागते. तीन दगडी खुंठे जमीनीत रोवून ही व्हळ बाहेर अंगणात असते. त्या व्हळीवर ताना पसरुन डांग, बैला व दोन काठ्याच्या सहाय्याने तयार ताना पसरुन घेतात व संपूर्ण धागे सुटे करुन डांग व जुपण्यावर दोरांच्या सहाय्याने ताणून लावून क्रमाने धागे प्रमाणात लावतात. यालाच परामणी करणे असे म्हणतात. परमणीतील सूतास शिजलेली खळ प्रमाणात पातळ करुन त्यात काळ्या कोळश्याची भुकटी करुन खळ काळपट केली जाते. अशी खळ पाजणीच्या धाग्यांना (सूतास) लावतात व संपूर्ण पाजणीस खळ लावावी लागते. खळीने धागे चिकटू नयेत म्हणून दोन लहान काठ्याच्या सहाय्याने हलवून सूत पाजणीस लावावी लागते. परत एक वेळ पुन्हा जाडसर खळ बनवून त्या पाजणीस लावावी लागते. अशा तऱ्हेने दोन वेळा पाजणी खळीने भिजवून घ्यावी लागते. उन्हात चांगली पाजणी बाळगून घ्यावी लागते. नंतर ही पाजणी तयार झाली की मग विणकामासाठी न्यावी लागते.
विणकामाची प्रक्रिया :
प्रथम तयार झालेली पाजणी खड्यामागावर घालून पसरतात. तूर, पोगर, निरी, दोन बास्त्या, ठोमकूल, दोरखुडा, हातखुडा व दोर याच्या सहाय्याने मागावर पाजणी ताणून घेतात. सूताचे धागे क्रमाने मोकळे करुन सारखे लावतात व निरी घालून योग्य प्रमाणात धागे ठेवतात नंतर वहीफनी तयार करावी लागते. वहीपनीसाठी सूती ढणक दोरा लागतो त्याला खळ लावून वाळवतात. त्यास वही म्हणतात. या वहीच्या सहाय्याने वही फनी पूर्ण करतात नंतर त्यास जतार बांधणी करुन पांजणीचे धागे खालवर करावे लागतात. ही तयारी झालेवर रचीला गावळा घेवून त्यावर पातळ करुन खळ घालून गावळा खळीने भिजवावा लागतो व हे भिजलेले सूत पोकळ नळीत नरबाळण्याने घालावे लागतात. यालाच नळ्या भरणे म्हणतात. हे काम स्त्रियांनी करावे लागते. साधारणत: एका नगास २० ते २५ नव्या भराव्या लागतात. वरील संपूर्ण तयारी झालेवर सणगर खडा मात्रात बसवून विणकाम करतो त्यासाठी नळीत भरलेले सूत (बाण्याचे धागे) याव व जतारचा वापर करुन नळीतील सूत इकडून तिकडे हाताच्या सहाय्याने नेतो. जतराच्या सहाय्याने खालवर करुन एक एक धागा पांजणी येवाच्या सहाय्याने ठेचून बसवावा लागतो. म्हणजेच विणकाम करावे लागते. संपूर्ण नग तयार करणेस सकाळी दहा पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत विणकाम करावे लागते. त्यावेळी एक नग तयार होतो.
नगाची रचना :
नग विणून झालेवर नगावर नग ठेवून नगाची घडी घालून जावळ तयार करतात. या दोन जावळीस एक बोध म्हणतात व आडबोध झाल्यावर एक अख्खे तयार झाले म्हणतात. अशा तऱ्हेने नग तयार करुन जावळीवर जावळ ठेवून उंच मंडणीच्या स्वरुपात घोंगड्याच्या नगाची ठेवण (राखण) करतात.
विक्री व्यवस्था :
एका नगास २/३ मुरी सूत लागते. पूर्वी सूताचा मुरीचा दर दोन ते अडीच रुपये होता तो सध्या १००/- रु. दरापर्यंत झालेला आहे. तसेच मजूरीचा दर पण दोन तीन रुपयापासून १००/- ते १५०/- रु. पर्यंत झालेला आहे. यामुळे विक्रीचा दर सध्या लोकरीच्या प्रतीनुसार २००/- रु. पासून ते १,५००/- पर्यंत एक नग विक्री केला जात आहे. सणगर तयार झालेले नग फिरुन किरकोळ अगर दलाल व्यापाऱ्यासही विकतो.
मिळकतीचे मान :
ताना तयार करण्यापासून खळ करणे, पाजणी करणे परत विणकाम करुन नग तयार करणेसाठी एक स्त्री व एक पुरुष सकाळी ६ पासून सायंकाळी ६ पर्यंत १२ तास दोघांना काम करावे लागते. विशेष म्हणजे कोणताही मजूर ८ तास काम करतो इथे मात्र १२ तास काम करावे लागते. दोघांची १२ तासाची मजूरी शिवाय जळण चिंचोके इत्यादी सर्व खर्च मिळून सध्या १२५/- ते १५०/- रु. पर्यंत दोघांना मिळतात. त्यावर त्यांना उदरनिर्वाह करावा लागतो. महागाईचे स्वरुप पाहता व मिळकतीचे मान पाहता समाजाला बिकट परिस्थितीशी तोंड द्यावे लागते. स्त्रियांना करावी लागणारी कामे चिंचोके फोडणे, खळ वाटणे व शिजविणे, ताना तयार करणे, गावळे बनविणे, नळ्या भरणे.
धंद्याची आजची स्थिती :
पूर्वी पासून वस्त्रउद्योगामध्ये घोंगडे हे लोकरीचे वस्त्र व धातू मध्ये तांब्याचे भांडे पवित्र मानले जात आहे. यांना सूतक व विटाळ मध्ये शिवाशिव होत नाही म्हणून या दोन वस्तू पवित्र मानल्या जातात. आज देखील जाणकार लोक या वस्तूंचाच वापर करतात. पण सर्व सामान्य जनता लोकरीचे घोंगडे टोचते अंगाला मऊ लागत नाही शिवाय सध्या जमखाने, चादरी, रंग, चटई व रजई आकर्षक डिझाईन मध्ये उपलब्ध असून दराच्या बाबतीत घोंगड्याच्या मानाने कमी दरात मिळतात. तिकडेच लोक वळतात आणि हा धंदा संपूर्ण बसत चालला आहे. सध्या संपूर्ण समाजामध्ये ४ ते ५ माग चालू असलेले पहावयास मिळतील. तसेच धंदा बुडत असलेमुळे समाजातील लोक चहागाडे, सेंट्रींगचे काम, शेतमजूरी, कारखान्यात बिगारी म्हणून रोजगांरावर जातात.
शैक्षणिक अवस्था :
आजच्या स्थितीत सक्तीच्या शिक्षणामुळे मुले शाळा शिकतात मात्र प्रायमरी इ. ७ वी पर्यंत कसे तरी शिकतात. घरच्या आर्थिक बिकट परिस्थितीमुळे मध्येच शाळा सोडून धंद्याकडे वळावे लागते. ज्याची आर्थिक परिस्थिती बरी आहे ती मुले थोडीच उच्च शिक्षण घेऊन नोकरी करतात. बहुसंख्य समाज मागास आहे.
सामाजिक अवस्था :
ठराविक गावामध्ये मोजकीज लोकवस्ती असल्यामुळे समाजाला योग्य नेतृत्व व मार्गदर्शन मिळत नाही. ना-घर, ना-शेत असा भटकासमाज पोटासाठी मिळेल ते काम करुन जगत आहे. ठराविक मुले उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतात. त्यांची पण अवस्था मागाससाठी ३० टक्के आरक्षणामुळे सर्वसामान्य जमातीमुळे शिक्षणासाठी व नोकरीसाठी ५० ते ६० टक्के गुण असून त्या कॅट्यॉगिरीत बसतात. मात्र मागास मध्ये अनु. जाती, जमाती, इतर भटकी अशा अनेक जातीचे लोक घातल्यामुळे त्या मुलांना ६० ते ६५ टक्के गुण पडूनही कॅट्यॉगिरीत बसत नाही. सरकारने सवलती ठेवल्या आहेत. मात्र त्या दिशाहीन असल्यामुळे सुधारकाचीच प्रगती होते व मागास तो मागासच बनत आहे.
सरकारची कर्तव्ये :
अशा त-हेची अत्यल्प लोकसंख्या असलेमुळे समाजामध्ये योग्य स्थान (पद, आमदार, खासदार) मिळत नाही. सरकारने मागास समाजातील खूप सोई सवलती ठेवल्या आहेत मात्र त्याचा लाभ अत्यल्प समाजाला कितपत होतो हे पाहिले जात नाही. त्यामुळे अशा समाजात प्रगती व उन्नती होत नाही. त्यासाठी अत्यल्प समाज समजून अनु. जातीसाठीच्या सर्व सोयी सवलती या अशा समाजाला दिल्या पाहिजेत. या समाजाचा वेगळाविचार करुन योग्य सोयी सवलती दिल्या तरच अशा समाजाची उन्नती व प्रगती साधता येईल.
माहिती सोर्स - समस्त सणगर समाज माहिती पुस्तक आणि सकाळ वृत्तपत्र